Friday, October 29, 2010

फेसबुकचा रंग निळा का? (Why Facebook having Blue Colour?)



फेसबुक चे आतापर्यंत ५०० मिलियन पेक्षा जास्त युझर आहेत
साईन-अप पेजपासून ते लोगोपर्यंत सर्व काही निळं. मोबाईल अप्लिकेशन आणि पॉपअप होणारे डायलॉग विंडोही निळेच ! असं का?
दूरचित्रवाणीवरील ट्विग या प्रसिद्ध कार्यक्रमात लिओ लापोर्टने फेसबुकचा सहनिर्माता मार्क झुकरबर्ग याची कथा सांगितली. या कार्यक्रमामुळंच फेसबुक निळं का याचा उलगडा होतो. मार्क हा रंगांधळा आहे, पण त्याला निळा रंग स्पष्ट दिसतो. अन्य रंगच दिसत नसल्यानं, त्यानं फेसबुकचं डिझाईन निळ्या रंगातच असावं, असा आग्रह धरला होता.

रंगांचा मार्कवर काहीच परिणाम होत नाही. निसर्गातील रंगांची उधळण त्याला समजत नाही. परंतु, आकाशाचा निळा रंग त्याला सहज दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःचीच रंगांची ऑनलाईन टेस्ट घेतली आणि त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला लाल आणि हिरवा रंगच दिसत नाही. निळा रंग हा माझ्यापुरता उत्कृष्ट आणि एकमेव रंग असल्यानं, मी निळा रंगच निवडला, असं मार्कनं या परीक्षणानंतर सांगितलं. त्याशिवाय वेब डिझाईनमध्ये निळ्या रंगालाच बहुतेकांनी प्राधान्य दिल्याचं दिसतं.

निळ्या रंगाची उधळण करण्यात केवळ फेसबुकच आघाडीवर आहे, असं नाही. जगातील पहिल्या शंभर संकेतस्थळांनीही निळ्या रंगालाच प्राधान्य दिलंय. त्या खालोखाल प्रभाव आहे तो लाल रंगाचा. फेसबुकनं निळा रंग स्वीकारण्याचे आणखी एक कारण हे त्यांच्या सुनियोजित मार्केटिंगशी निगडित आहे. बहुतेक रंगांकडे मानवी डोळे आकृष्ट होतात आणि तिथंच खिळून राहतात. मात्र, निळा रंग हा डोळ्यांसाठी पारदर्शकतेचं काम करतो. त्याशिवाय हा रंग आणि हिरवा रंगही मेंदूसाठी निर्वाणाचा म्हणून मानला गेलाय. अखेर त्यांनी या रंगाची केलेली निवड ही केवळ भावनेच्या आधारावर केलेली नाही, हे त्यातून स्पष्ट होतं.

No comments:

Post a Comment